Friday 19 April 2024

आता लागणार साक्षमोक्ष...!

"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक हवालदार बनलाय. उद्योगपती, काळाबाजारवाले, सरकारी कंत्राटं घेणारे, विषारी औषधे बनवणारे, ड्रग्ज, अंमली पदार्थांचे व्यापारी, मद्य विक्रेते त्या टपरीवर म्हणजे स्टेट बँकेत जातात 'इलेक्टोरल बॉण्ड्स' खरीदतात आणि ते हवालदाराकडे बहाल करतात. मूल्याधिष्ठित राजकारण, पार्टी विथ डीफरन्स म्हणणारा, सचोटीचा विश्वास देणारा, गिन्न्या, पावल्या मोजणाऱ्यांचा पक्ष हा सटोडिये, बनिया आणि क्रिमिनल्सनी घेरल्यावर दुसरं काय होणार? आत्मिक साधनसुचिताचा विश्वास देणारा पक्ष जेव्हा मणिपूर मधला नंगानाच, देशाला गौरव प्राप्त करून देणाऱ्या तरुणी जेव्हा विनयभंग झाल्याचा आक्रोश करतात. दंगल घडवणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या, खून्यांचा जेव्हा सत्कार होतो, भ्रष्टाचाऱ्यांना मानाचं पान दिलं जातं, तेव्हा माणसाची बुद्धी गुंग होते. पण अंधभक्तांना याचं काहीच वाटत नाही, जणू त्यांच्या भावना थिजून गेल्यात!"
----------------------------------
*नु*कतंच सोलापुरात एका समारंभासाठी उपस्थित होतो. 'दैनिक संचार'च्या इंद्रधनू पुरवणीत माझं 'प्रभंजन' नावाचं सदर वाचणारे वाचक उपस्थित होते. ज्या संस्थेनं हा समारंभ आयोजित केला होता, त्यातली बहुसंख्य मंडळी ही संघ-भाजपच्या विचारांची होती. त्यामुळं त्यांना मी काय बोलणार याची उत्सुकता होती. मी तिथं फारसं बोललोच नाही. त्यामुळं अनेकांची निराशा झाली. मात्र  संयोजकांपैकी काहींना मला काही प्रश्न विचारायचं होतं. त्यांचं शंका समाधान करण्याची नामी संधी मिळाली असल्यानं मीही त्यांच्या साऱ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. त्यांच्या शंकांचं निरसन केलं. त्यातून काहींचं समाधान झालं, पण जे भक्त होते त्यांच्या वेगळ्या प्रतिक्रिया होत्या. भाजपच्या आयटी सेल्स पसरविल्या 'व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटी'च्या बातम्या त्यांच्या डोक्यात ठासून भरलेल्या होत्या. त्याचं प्रत्यंतर प्रत्येक प्रश्नातून दिसून येत होतं. झोपलेल्यांना जागं करणं शक्य असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं कसं करणार? त्यातले काही आपल्या मतांशी ठाम होते. त्यांचं मतपरिवर्तन करणं हे माझं काम नव्हतं, त्यामुळं त्यांच्या विचारांशी दिशा बदलायची तसदी घेतली नाही. मात्र त्या चर्चेतून जे मांडलं गेलं, त्याच्यातला हा गाभा मांडण्याचा हा प्रयत्न! 
देशातलं राजकीय वातावरण सध्या नीचतम पातळीवर आलेलंय. लोक आपापल्या नेत्यांच्या भक्तीत इतके आकंठ बुडालेलेत, की तुम्ही त्यांनी पसरवलेल्या खोट्या बातम्या ह्या खोट्या आहेत, हे पुराव्यानिशी जरी स्पष्ट करून सांगितलं, तरी त्यांना त्याचा पश्चाताप वाटत नाही. वेगवेगळ्या प्रसारयंत्रणा वापरून भाजपनं काही विशेष संदेश, मजकूर लोकांमध्ये पसरवलेत. पण ते मेसेजेस काय आहेत, हे पाहण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचंय, की कोणताही पक्ष पूर्णपणे चांगला, किंवा पूर्णपणे वाईट नसतो. आजवरच्या प्रत्येक सरकारनं काही चांगली कामं केली आहेत, तर काही ठिकाणी माती खाल्लीय. एखादा देश आणि व्यवस्था घडवायला कधीकधी दशकं, शतकं उलटावी लागतात. भाजपचं सगळ्यात मोठं अपयश हे आहे, की त्यांनी अतिशय क्षुल्लक कारणांवरून काही चांगल्या गोष्टींची वाट लावून टाकलीय. इलेक्टोरोल बॉण्ड्स म्हणजेच निवडणूक रोख्यांबाबत भाजपनं जो निर्णय घेतलाय, तो सरळ सरळ भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्याचाच प्रकार आहे. आपण कोणत्या राजकीय पक्षाला देणगी दिली हे सांगण्याचं बंधन मोठमोठ्या कॉर्पोरेट्सवर नाही. समजा उद्या एखाद्या मोठ्या कंपनीनं त्यांच्या हिताचा कायदा पास करून घेण्यासाठी एखाद्या पक्षाला हजार कोटी रुपये किमतीचे इलेक्टोरोल बॉण्ड्स देणगी म्हणून दिले, तर त्याची कसलीही चौकशी होणार नाही. कारण यासंदर्भातली कोणतीही माहिती उघड करण्याचं त्यांच्यावर बंधनच नाही. सुप्रीम कोर्टानं हे इलेक्टोरोल बॉण्ड्स बेकायदेशीर ठरविलेत. यातून कुणी कुणाला निधी दिलाय याची माहिती द्यायला स्टेट बँकेनं खळखळ केली. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ती माहिती देऊ अशी भूमिका घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयानं ती मागणी फेटाळून २४ तासात निवडणुक आयोगाला द्यावी आणि ती वेबसाईटवर अपलोड करावी असा आदेश दिल्यानं बँकेचा नाईलाज झाला, आणि इलेक्टोरोल बॉण्ड्समधून सरकारच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं झालं. त्यामुळं सरकारच्या लाभार्थी वकिलांनी सरन्यायाधिशांना नुकतंच एक पत्र लिहून अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या न्यायदानावर शंका व्यक्त केलीय. इतर घटनांबाबत मौन पाळणाऱ्या प्रधानमंत्री मोदींनी लगेचच एक्स वर प्रतिक्रिया देण्याची तत्परता दाखविलीय. सर्वोच्च न्यायालयानं सरकारच्या अनेक कारभाराचं आजवर वस्त्रहरण केलंय. इलेक्टोरोल बॉण्ड्सनं तर सरकारला नग्न करून टाकलं. आणखी काही प्रकरणं न्यायालयासमोर आहेत. त्यावर निर्णय देताना त्यांच्यावर दबाव राहावा, कारभाराचे धिंडवडे निघू नयेत यासाठी हा पत्रप्रपंच केला गेलाय.
दुसरा मुद्दा, पूर्वी सरकारच्या किती योजनांची कितपत अंमलबजावणी झालीय, त्याचा किती, काय आणि कोणता फायदा होतोय वगैरे माहिती योजना आयोगाच्या रिपोर्ट्समधून मिळायची. पण भाजपनं हा योजना आयोगच बरखास्त करून टाकला. त्यामुळं सरकार जो डेटा सांगेल, त्यावर विश्वास ठेवण्यावाचून काहीही पर्याय राहिलेला नाही. कॅग ऑडिटमधून माहिती मिळते, पण ऑडिट होण्यात वेळ निघून जातो. योजना आयोग बरखास्त करून नेमलेला नीती आयोग ही सरकारची पी.आर. एजेंसी बनलीय. इन्कमटॅक्स, सीबीआय आणि एन्फोर्समेंट डिपार्टमेंट- इडी चा वापर फक्त विरोधकांवर दबावासाठीच केला जातोय, हे आता लपून राहिलेलं नाही. पण ज्यांच्यावर इडीची कारवाई झाली त्यांनी भाजप जवळ करताच त्यांना दोषमुक्त केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आहेत. नुकतंच प्रफुल्ल पटेल यांना ८४७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारातून मुक्त करण्यात आलंय. अचानकपणे  केलेली नोटबंदी-डिमॉनिटायझेशन पूर्णपणे अयशस्वी झालीय. 'त्यावेळी ५० दिवसात काळा पैसा बाहेर आणला नाही तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे...!' असं सांगितलं गेलं. पण त्यापेक्षा वाईट म्हणजे हे अमान्य करणं की, ते एक अयशस्वी प्रकरण आहे. यामुळं आतंकवाद्यांची फंडिंग थांबलीय, कॅशलेस इकॉनॉमी झालीय, भ्रष्टाचार थांबलाय ही दिली जाणारी कारणं अगदी हास्यास्पद आहेत. जीएसटी गडबडीत लागू केली, त्यामुळं फायदा होण्याऎवजी नुकसानच झालंय. आशा आहे, की येत्या काही काळात सगळं सुरळीत होईल, पण अंमलबजावणी करण्यात आपण चुकलो, हेही भाजप कबूल करत नाहीये. हे केवळ मुजोरपणाचे लक्षण आहे. फक्त टाळ्या मिळवण्यासाठी केलेल्या परराष्ट्र धोरणाचा पुरता फज्जा उडालाय. चीननं श्रीलंकेतल्या मोक्याच्या ठिकाणी असलेलं बंदर आपल्या ताब्यात घेतलंय. आता चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशशी जवळीक साधतेय. मालदीवनं भारतीय कामगारांना वर्क परमिट आणि बिझनस व्हीसा देणं बंद केलंय. दुसरीकडं प्रधानमंत्री परदेशात जाऊन, 'भारतीयांना २०१४ पूर्वी जगात कुठेही मान-सन्मान मिळत नव्हता, पण आता सगळीकडे त्यांना मान-सन्मान मिळायला लागलाय...!' असं सांगतात. भारतीयांना मिळतो तो मान-सन्मान हा आपली आयटी इंडस्ट्री आणि पूर्वीपासून सतत वाढणारी अर्थव्यवस्था ही आहे. आणि त्याचं तसूभरही क्रेडिट मोदीजींना जात नाही. उलट मॉब लिंचिंग, पत्रकारांना मिळणार्‍या धमक्या वगैरेंमुळे आपली इमेज खराब होतेय.
मोदींनी आजवर जाहीर केलेल्या विविध योजना ज्या अयशस्वी ठरताहेत त्यांचं अपयश कबूल करून त्यात सुधारणा घडवून आणण्याचं कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीये. फसल बीमा योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट यासारख्या काही योजना. शेतकर्‍यांच्या आणि बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याऐवजी प्रत्येक मुद्द्याला विरोधकांचं षडयंत्र म्हणून सरकार आपली जबाबदारी झटकतेय. पूर्वी गॅस, पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावर कॉंग्रेसवर तुटून पडणारे भाजपनेते आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असूनही गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचं समर्थन करतात. शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत विषयांकडं दुर्लक्ष होतेय. शिक्षण क्षेत्रात काहीही बदल होत नाहीयेत, हे देशाचं मोठं अपयश आहे. गेल्या दशकभरात सरकारी शाळांची अवस्था दयनीय झालीय, आणि इतिहास बदलाशिवाय शिक्षण पद्धतीत काहीही सुधारणा होत नाहीये. याबाबत ‘एएसइआर-असर’ म्हणजे अन्युल स्टेटस एज्युकेशनचा अहवाल प्रसिद्ध झालाय. गेल्या १० वर्षांत भाजपनं आरोग्याच्या क्षेत्रातही काही केलेलं नाही. नाही म्हणायला सरकारनं 'आयुष्मान भारत' योजना आणली पण त्यातला फोलपणा उघड झालाय. आरोग्याच्या या योजनेचीच  जास्त भीती वाटतेय. अशा विमा योजनांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाहीये.
भाजपनं सगळ्यात वाईट काही केलं असेल, तर ते म्हणजे देशातलं सगळंच वातावरण गढूळ करून टाकलंय. पण हे त्यांचं अपयश नाही, तर त्यांची ती अतिशय पद्धतशीरपणे आखलेली योजना आहे. याच स्ट्रॅटजीचा एक भाग म्हणजे, जे पत्रकार 'मुद्द्यांवर' आवाज उठवत आहेत, त्यांना पेड पत्रकार किंवा कॉंग्रेसी दलाल ठरवून टाकणं. प्रसंगी ते त्यांच्यावर वैयक्तिक हल्लेही करतात आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. देशात गेल्या ७५ वर्षांत काहीही चांगलं झालेलं नाही, असाही एक अपप्रचार केला जातोय. हा तर खोटारडेपणाचा कळस आहे, शिवाय ही मानसिकताच देशासाठी नुकसानदायक आहे. भाजपनं आपल्या कारभाराची प्रसिद्धी आणि प्रचार करण्यासाठी जाहिरातींवर कित्येक हजार कोटींचा खर्च केलाय. त्यांना हव्यात त्याचं आणि तशाच गोष्टी ते आपल्या मनावर बिंबवताहेत. भाजपची मदार फेक न्यूज आणि तिच्या प्रसारावर अवलंबून आहे. इंटरनेटवर काही अ‍ॅंटी-भाजप फेक न्युज बनवणार्‍या वेबसाईट्सही आहेत, पण भाजपच्या वेबसाईट्सपुढे त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. या अशा वेबसाईट्सना सरकारचा जो राजाश्रय मिळतोय, त्यामुळं आपल्या समाजाचं खूप नुकसान होतंय, हेच मुळी आपल्याला कळत नाहीये. 'हिंदू खतरे में है, और सिर्फ मोदीजीही अब हिंदुओं को बचा सकते है...!' ही भावना लोकांच्या मनात निर्माण करण्यात भाजप बर्‍याच अंशी यशस्वी झालीय. हे सरकार आल्यापासून इथल्या लोकांची विचारसरणीच बदलून गेलीय. आपण हिंदू २०१४ पूर्वी धोक्यात होतो का? मी तर त्यावेळी हे वाक्य कधीही ऐकलं नव्हतं. हिंदूंच्या राहणीमानात काही सुधारणा घडवून आणण्याऐवजी उलट भाजपनं हिंदूंच्याच मनात एक भीतीची आणि द्वेषाची भावना निर्माण केलीय. सरकारविरोधात काही बोलाल, तर तुम्हाला लगेच देशद्रोही, हिंदूविरोधी ठरवलं जातं. भाजप नेत्यांना स्वतःला 'वंदे मातरम्‌' नीट म्हणता येत नाही, पण ते दुसर्‍याला बळजबरी 'वंदे मातरम्‌' म्हणायला सांगतात आणि त्यावरून इतरांची देशभक्ती मोजतात. मला स्वतःला माझ्या राष्ट्रवादी असण्याबद्दल अभिमान आहे आणि माझा राष्ट्रवाद दाखवण्यासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जिथं गरज असेल किंवा मला जेव्हा वाटेल, तेव्हा मी 'जन गण मन' म्हणेन किंवा 'वंदे मातरम्‌' म्हणेन. ते म्हणण्यासाठी माझ्यावर कोणाला जबरदस्ती करू देणार नाही! हिंदू-मु्लिम, देशभक्त-देशद्रोही, भारत-पाकिस्तान... हे २४ तास चालवणारे काही न्युज चॅनल भाजप नेत्यांचेच आहेत. यांचा मुख्य उद्देश तुमचं लक्ष तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवरून, मुद्द्यांवरून हटवून तुम्हाला हिंदू-मु्लिम, देशभक्त-देशद्रोही, भारत-पाकिस्तान यात अडकवण्याचा आहे. विकासाचा मुद्दा तर कधीचाच बाद झालाय. निवडणुकांसाठी समाजाचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण करणं, पोकळ देशभक्तीला प्रोत्साहन देणं हीच भाजपची स्ट्रॅटजी आहे. मोदींनी स्वतःच अनेक वेळा फेक न्युज पसरवलेल्या आहेत. कॉंग्रेसनेते भगतसिंहांना भेटायला गेले नव्हते, मनमोहनसिंह गुजरातमध्ये पाकिस्तानची मदत घेत, जिन्ना, नेहरू, तुकडे-तुकडे गँग, जेएनयु.... हा सगळा एक पद्धतशीरपणे केला जाणारा अपप्रचार आहे. ही काही मोजकीच उदाहरणं आहेत.
२०१३ ला मोदींमध्ये मला देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आशेचा किरण दिसत होता. मी त्यांच्या विकासाच्या मॉडेलला भुललो होतो. आज विकासाचं ते मॉडेलही गायब झालेलंय आणि आशेचा तो किरणही गायब झालेलाय. मोदी सरकारच्या पॉझिटीव्ह कामांपेक्षा त्यांच्या निगेटीव्ह कामांचीच यादी खूप मोठी दिसतेय. लक्षात ठेवा, 'अपप्रचाराला बळी पडणं' आणि 'एखाद्याची आंधळी भक्ती करणं' याच्याएवढं वाईट काम दुसरं कोणतंही नसेल. असं करणं लोकशाही आणि देशहिताच्या विरोधात आहे. निवडणुका आल्या आहेत, तुम्ही तुमचा काय तो निर्णय घ्या. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपली विचारधारा किंवा आपला पक्ष कोणताही असो, पण आपल्या सगळ्यांना गुण्यागोविंदानं एकत्र राहता येईल, एकत्र काम करता येईल आणि एक विकसित भारत बनवता येईल याची काळजी घ्या. माझा प्रत्येक मुद्दा पटेलच असं नाही, पण किमान एकदा तरी शांतचित्तानं काय लिहिलंय ते का लिहिलंय याचा विचार तरी कराल ना? तुमचा 'वापर' तर करून घेतला जात नाही ना? ज्या देशभक्तीच्या तुम्ही गप्पा मारता, त्यानं देशाचं भवितव्य तुम्ही बिघडवत नाहीत ना? ज्या समाजात तुम्ही लहानाचे मोठे झालात, त्याच समाजात तुम्ही विष पसरवत नाही ना? देशाचं हीत आणि एका राजकीय पक्षाचं हीत यात तुमची गल्लत तर होत नाही ना? बघा, करा विचार जमल्यास.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 13 April 2024

'राजा'ज्ञा : भ्रम आणि संभ्रम....!

"अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी भाजप वा महायुतीला पाठिंब्याचा ब्रही न काढता 'कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा...!' जाहीर केला. आणि महायुतीवर टीका करण्याचा अधिकार राखून ठेवला. राज यांची प्रत्येक निवडणुकीत बदलती भूमिका ही अनाकलनीय नाही तर, ज्या बाजूला उद्धव ठाकरे जातील त्याच्या विरोधात उभं राहायचं असं राज यांचं सूत्र दिसून येतं. आधी उद्धव भूमिका घेतात मग त्यानुसार राज यांची प्रायोरिटी प्राथमिकता दिसून येते. आताही असंच घडलंय. कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याची आज्ञा त्यांनी केली. पण आधीच गोंधळलेल्या महायुतीच्या जागावाटपात मनसेला स्थान किती असणार? त्यामुळं राज यांनी मोदींच्या पाठिंब्यानं जो भ्रम निर्माण केलाय त्यामुळं आणि राजकीय भूमिकांच्या धरसोडवृत्तीने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय!"
--------------------------------------------
*म* हाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्धिमाध्यमांनी उत्सुकता ताणलेल्या मनसे म्हणजे राज ठाकरे यांच्या  काय घडलंय आणि काय घडतंय...! या शिवाजी पार्क वरच्या सभेला नेहमीप्रमाणे गर्दी ही होतीच. राजच्या सभांना सामान्यांच्यापेक्षा माध्यमांचच अधिक लक्ष असतं. परंतु राज ठाकरे यांनी गाजावाजा करून भाजपचे चाणक्य अमित शहा यांची जी दिल्लीत जाऊन भेट घेतली, त्यात नेमकं काय घडलं हे ते सांगणार होते पण तसं काही घडलं नाही. त्या भेटीबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही नेहमीच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्यांनी आपल्या ३४ मिनिटांच्या भाषणात अखेरची दोन वाक्ये महत्वाची ठरली. 'मोदींना बिनशर्त पाठिंबा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा...!' त्यामुळं त्यांच्या त्या सभेतून महाराष्ट्र सैनिकांचा भ्रमनिरास झाल्याचं जाणवलं. काय घडलंय आणि काय घडतंय...! अशा जाहिराती करून राज यांनी आपल्या भाषणांला एक वेगळं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळं सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळं राज यांचा तो भ्रम ठरला तर कार्यकर्त्यांत संभ्रम! गेल्या महिन्यात 'अखेर राज लवंडले.....!' या मथळ्याखाली लेख लिहिला होता त्यानुसार राज यांनी 'मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला!' ते अभिप्रेतही होतं, पण मोदींना पाठींबा देताना त्यांनी महायुतीला पाठिंबा वा महायुतीत जाणार हे स्पष्ट केलं नाही. तो त्यांनी आपला शब्द राखून ठेवला. महायुतीतल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपही यांच्यावर वेळप्रसंगी टीका करण्याचा आपला अधिकार राखून ठेवलाय, हे इथं नमूद केलं पाहिजे. प्रारंभी त्यांनी आपला स्वाभिमान जागा करून आपण शिंदेंच्या शिवसेनेचा ताबा घेणार नाही. मी माझं अपत्य मनसे आणि कष्टानं मिळवलेलं इंजिन चिन्ह सोडणार नाही, हे सांगताना त्यांनी शिंदे यांच्याबद्दल जे 'शी..ss !' असं जे म्हटलं त्यातून त्यांना काय अभिप्रेत आहे हे दिसून आलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातले काही घडलं आणि घडतंय यावर त्यांनी जे भाष्य केलं ते महत्वाचं आहे. त्याला त्यांनी  'राजकीय व्यभिचार' असा शब्द वापरला आणि लोकांना आवाहन केलं की, या राजकीय व्याभिचाराच्या विरोधात मतदान करा...! म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे स्पष्ट होत नाही. व्यभिचार जर शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलं असेल तर, ती करायला लावणारी त्यामागची महाशक्ती भाजप ही व्यभिचारी नाही का? मग महशक्तीचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा राज कसे काय देतात? त्यांच्या मते उद्धव आणि शरद पवारांनी राजकीय व्यभिचार केलाय असं म्हणणं असेल तर त्यांना मतं देऊ नका असं सांगणं राजना शक्य होतं, मग त्यांनी राजकीय व्यभिचार संबोधून महायुतीला देखील लक्ष्य केल्याचं दिसतं. राज हे लोकसभा निवडणूक लढवत नाहीत तरी देखील एकदा मोदींवर 'लाव रे तो व्हिडिओ...!' म्हणत कडाडून टीका केली होती. आता मोदींना बिनशर्त पाठींबा देत महाविकास आघाडीला लक्ष्य करणार आहेत. त्यांच्या या सततच्या बदलत्या भूमिकांमध्ये कार्यकर्त्यात संभ्रमावस्था आहे.
देशाची दिशा ठरवणाऱ्या लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाग न घेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. या त्यांच्या भूमिकेनं मनसैनिक द्विधा अवस्थेत असून लोकसभा निवडणूक लढणार नाही तर मग विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितलं असल्यानं कार्यकर्त्यांत संभ्रमाचं वातावरण आहे. हे संभ्रमाचं कोडं कार्यकर्त्यांना सुटता-सुटत नाहीये. विशेषतः येत्या काळात मनसे लोकसभेनंतर कुठली निवडणूक लढवणार की नाही?, निवडणूक रिंगणात उतरला तर उमेदवार उभे करणार की नाही? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आता कोणता झेंडा हाती घेणार? पक्षाचा की महायुतीचा? प्रत्यक्ष प्रचारात सहभागी व्हायचं की नाही? राज ठाकरे सभा घेणार की नाहीत? अशा मोठ्या निवडणुकीत पक्षातल्या नेतेमंडळींची भूमिका काय असणारंय? अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ कार्यकर्त्याच्या मनात घोंघावतंय. त्यामुळं हा कार्यकर्त्यांच्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. राज ठाकरे यांनी १५ दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीयमंत्री अमित शहा यांची दिल्ली दरबारी भेट घेतल्यानंतर विविध चर्चाना उधाण आलं होतं. ते लोकसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवतील असे अनेकांना वाटत होतं. मात्र, राज यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमितानं पक्षाची भूमिका जाहीर करताना २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवलाय. त्यांची भूमिका अजूनही तळ्यात-मळ्यातच दिसतेय. आजवर राज यांची भूमिका पक्षनिर्मितीपासूनच तळ्यात-मळ्यात अशीच राहिलीय. त्यामुळं त्यांना पक्ष निर्माण करून १८ वर्षे झाली असली तरी त्यांनी कोणासोबत जायचंय? हे ठोस ठरवलं नसल्यानं अडचणी येताहेत. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्यानं त्यांच्या भूमिकेविषयी नेहमीच संभ्रम पाहण्यास मिळतो. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढवल्या होत्या. २००६ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज यांच्या नवख्या मनसेनं पहिल्याच फटक्यात २७ नगरसेवक निवडून आले. नाशिक महापालिका ताब्यात घेतली. पुणे महापालिकेत २८ नगरसेवक निवडून आले होते, तर २००९ मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. राज यांच्या या नेत्रदीपक यशामुळे शिवसेनेसमोर आव्हान उभं झालं होतं. मात्र, यशाची ही घोडदौड राजना पुढे कायम ठेवता आली नाही. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची भूमिका बदलत गेल्यानं यशाचा आलेख खालावत गेला. 
आज महायुतीला राज यांची गरज नाहीये तर राज यांना महायुतीची गरज आहे. कारण महायुतीत आता एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले यांच्या बरोबरच इतर अनेक छोटे पक्ष आले आहेत. भाजपचे १०५, शिंदेंचे ५०, अजित पवारांचे ४० अपक्ष १२ अशी मोट महायुतीकडे असल्यानं त्यात मनसेचा शिरकाव विधानसभा निवडणुकीत कसा होईल? मनसेचा विधानसभा, महापालिका निवडणुकीत फायदा व्हावा म्हणूनच राज यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला असावा. पण लोकसभा निवडणुकीत राज यांची काही भूमिका असावी अशी स्थिती राहिलेली नाही. २०१९ मध्येही त्यांनी स्पष्ट केलं होतं की, लोकसभेच्या निवडणुका लढवणार नाही, पण त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन 'आपल्याला स्वातंत्र्य १९४७ मध्ये मिळालं, त्यानंतर १९७७ मध्ये आणीबाणीच्या विरोधात दुसरं स्वातंत्र्य मिळालं, आता पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशाच्या राजकीय पटलावरून नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दूर करायला हवं....! असं आवाहन करत 'लाव रे तो व्हिडिओ' या इले्ट्रॉनिक्स प्रचारानं धमाल उडवून दिली होती. आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेसला पूरक भूमिका घेतली होती. आता नेमकं त्याच्या विरोधात भूमिका घेताहेत, ही त्यांची, त्यांच्या पक्षाची गरज आहे. तो देखील पुढे येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत तुम्हाला काही मदत करू असं आश्वासन मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज यांना मिळणारा पाठींबा हा फ्लोटिंग असा आहे. त्यात सातत्य राहिलेलं दिसत नाही. याशिवाय त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेलेत. पक्ष स्थापना करताना व्यासपीठावर केवळ शिशिर शिंदे होते, ते बाहेर पडलेत. याशिवाय प्रवीण दरेकर, राम कदम, अवधूत वाघ, शिरीष पारकर, दीपक पायगुडे, संजय धाडी, वसंत मोरे, हाजी अराफत अशी अनेक नावं घेता येतील. २००६ पासून मनसेची जी वाटचाल आहे त्यात एक एक जण बाहेर पडलाय. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश चव्हाण अशी काहीजण सोबत आहेत पण तळागाळातले कार्यकर्ते हे फ्लोटिंग असल्याचं दिसून येईल. कार्यकर्तेही पक्ष सोडून जाताना दिसताहेत. मुंबई महापालिकेतल्या ७ नगरसेवकांपैकी ६ जण शिवसेनेत गेले. पुण्यातही २८ जणातून २ नगरसेवक राहिलेत. नाशिकमध्ये अशीच अवस्था आहे. ही पडझड का होतेय? ही वस्तुस्थिती नाकारता येतं नाही. राज यांच्या सभांना गर्दी होते, त्यांच्यामागे लोकभावना आहे, त्यांना गर्दी जमवावी लागत नाही, त्यांचं वक्तव्य अमोघ आहे. पण लोकांमध्ये मिसळणं, कार्यकर्त्यांना वेळ देणं हे त्यांना फारसं जमत नाही. त्यामुळं कार्यकर्ते, नेते दुरावले जाताहेत हे लक्षांत येऊनही त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. कार्यकर्ते फक्त आंदोलनासाठी वापरले जातात. टोल विरोधी, मशिदीवरचे भोंगे बंद करण्यासाठी, मराठी पाट्यासाठी अशा आणि इतर आंदोलनापुरतेच ते मर्यादित राहिलेत. त्या आंदोलनांचे मतांमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. हे राज यांनाही समजून आलंय, त्यांनी आपल्या अनेक सभातून असं सांगितलंय की, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना देखील ४०-५० वर्षे गर्दी होत असे पण त्याचं मतांमध्ये रुपांतर व्हायला कालावधी जावा लागला. तसा सूर अद्यापि राज यांना सापडलेला नाही. लाखोंची सभा झाली म्हणजे मतं मिळतात असं काही नाहीये पण कालांतराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी यांना जशी मतं मिळाली तशी आम्हाला मिळतील. हा भाबडा आशावाद दिसून येतो. १८ वर्षाचा कालावधी लोटला पण अद्याप तसा योग आलेला नाही. त्यांना २००९ मध्ये जे यश मिळालं ते शिवसेना भाजप यांच्या युतीच्या काळात. कारण ज्या भाजपच्या आणि संघाच्या स्वयंसेवकांना युती नको होती म्हणून त्यांनी मनसेला ती मतं दिली. मात्र २०१४ मध्ये शिवसेना भाजप युती तुटली त्यानंतर भाजप, संघाची मतं ही पुन्हा भाजपकडे गेली. त्यानंतर मनसेची जी घसरण झाली ती झाली. आज मितीला केवळ १.५ टक्के मतं मनसेकडे आहेत. त्यावर भाजपचा डोळा आहे. त्यासाठी राज यांना गोंजरलं जातंय. 
राज यांची भूमिका सातत्यपूर्ण राहिलेली नाही. मोदींचा स्वीकार, त्यांना प्रधानमंत्री करण्याची मागणी, नंतर त्यांना राजकीय पटलावरून दूर करण्याची भूमिका, आता पुन्हा कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठींबा या बदलत्या भूमिकांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर जसा प्रश्नचिन्ह उभं राहतो तसाच तो कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करतं. २०१९ मध्ये मोदींचे वाभाडे काढले ते खरं होतं की, आजची भूमिका खरी आहे? असं वाटणं स्वाभाविक आहे. वाढती महागाई, तरुणांच्या बेकारीचा प्रश्न, शेतकऱ्यांची आंदोलनं, महिला खेळाडू आणि मणिपूरमधल्या महिलांची विटंबना, इलेक्टोरल बॉण्ड्स मधला भ्रष्टाचार, पीएम केअर फंडाचा गैरवापर अशा अनेक बाबींचा देशभरात उहापोह होत असताना त्याबाबत मौन बाळगत मोदींना पाठिंबा देणं कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही म्हणूनच कार्यकर्ते मग वसंत मोरे असोत वा किर्तिकुमार शिंदे असोत असे अनेक बाहेर पडताहेत. इथं कार्यकर्त्यांची गोची होतेय, कारण त्यांना लोकांमध्ये जाऊन मतं मागावी लागतात तेव्हा मतदारांच्या 'तुमचे नेते सतत भूमिका बदलत असतात..!' अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. राज यांना शिवाजी पार्कच्या सभेत मोठा प्रतिसाद मिळतो, टाळ्या मिळतात, मात्र कार्यकर्त्यांना जनमाणसांत जावं लागतं त्यामुळं ते भांबावले आहेत. पाच वर्षांपूर्वी आपण 'मोदी शहा हटाव...!' म्हणत होतो मग आता त्यांनाच मतं द्या असं कोणत्या तोंडानं म्हणणार? यावर राज यांचं म्हणणं आहे की, 'केवळ मीच नाही तर सगळ्याच पक्षांनी आपली भूमिका बदललीय. देवेंद्र फडणवीस यांनी आपद् धर्म, शाश्वत धर्म अश्या कोणत्याच स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती नाही म्हणजे नाही.... अजित पवार चक्की पिसिंग अँड पीसिंग...! म्हटलं होतं. आता ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. शरद पवारांनी शिवसेनेवर गेली ३०-४० वर्षे जातीयवादी म्हणून टीका केलीय. काँग्रेसनं देखील शिवसेनेवर टीका केलीय. तसंच शिवसेनेनेही काँग्रेस, राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. आज मात्र ते एकत्र आलेत. मग मलाच का लक्ष्य केलं जातंय....?'
 २००९ च्या निवडणुकांपासून आजवर पहा राज हे उद्धव यांच्या विरोधात भूमिका घेत आलेत. मध्यंतरी त्यांनी शरद पवारांची मुलाखत राज यांनी घेतली होती,  त्यावेळी त्यांनी पवारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता, पण उद्धव ठाकरे हे पवारांबरोबर गेल्यानं त्यांचा हिरमोड झाला, त्यामुळं ते आता मोदींसोबत निघालेत. त्याचं एकमेव कारण हे आहे की, उद्धव हे आज मोदींच्या विरोधात उभे ठाकलेत. २०१९ पासून उद्धव विरोधात जाताच राज यांची भाजपशी जवळीक वाढली. मग हिंदुत्व स्वीकारणं, मशिदींवरील भोंगे, भगवी शाल गुंडाळून महाआरती करणं, हनुमान चालीसाचं पठण अशा हिंदुत्वाच्या भूमिका घ्यायला सुरुवात केली. याचा अर्थ असा की, राज यांची प्रायोरिटी ही काय असावी हे जणू उद्धव ठाकरे ठरवताहेत. असा त्याचा अप्रत्यक्ष अर्थ होतो. त्यामुळं राज यांना मोदींचं प्रेम उफाळुन आलंय वा त्यांची भूमिका, धोरणं, देशाचा विकास, त्यांचा अजेंडा पसंत पडलाय असं काही नाही, तर केवळ आणि केवळ उद्धव यांना विरोध म्हणूनच राज असे मोदींच्याकडे लवंडलेत! असा त्यांचा फॉर्म्युला आहे. विधानसभेच्या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा मात्र राज यांचा कस लागणार आहे. तेव्हा भाजप म्हणेल तसे मनसे, त्यांच्या बाजूला झुकलेले एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष वागतीलच असं काही नाही. कारण भाजप आता महाशक्ती म्हणून समोर आलीय. एकदा का लोकसभेच्या निवडणुका झाल्या की, मग भाजपची खरी भूमिका स्पष्ट होईल. आज लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे आणि पवार यांची जशी गोची करून टाकलीय त्याहून अधिक विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आपल्या मित्रपक्षांची करेल. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स अशा तपास यंत्रणांचा आसूड त्यांच्याकडे आहे. त्याचा धाक दाखवून ते आपल्यालाही हवं ते साध्य करून घेतील. पण भाजपच्या सोबत गेलेल्या मनसेच नाही तर शिंदे, पवार यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न असणार आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत तुमचं ऐकलं, जागा कमी घेतल्या, उमेदवार बदलले, आता आमच्या बरोबर आलेल्यांना न्याय द्यायला हवाय असं शिंदे, पवार, आठवले, बच्चू कडू व इतर साथीदार म्हणतील. मग भाजपच्या १०५ जणांनी करायचं काय. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही गप्प बसलो आता नाही. या सगळ्यांची मोट बांधता बांधता नाकी नऊ येणार आहे. अशात मग मनसेला काय आणि किती जागा मिळणार? अशा वातावरणात ' तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा...!' असं म्हणणं कितपत योग्य ठरणार आहे. तिथं किती जणांना सामावून घेतलं जाणार आहे?
हरीश केंची
९४२२३१०६०९

आता लागणार साक्षमोक्ष...!

"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...